10 वी - मराठी (रसग्रहण)

जनीं आर्जव तोडू नये । पापद्रव्य जोडू नये ।
पुण्य मार्ग सोडू नये । कदाकाळी ॥
आशयसौंदर्य - वरील काव्यपंक्ती ही 'उत्तमलक्षण' या कवितेतील आहे. या कवितेचे कवी संत रामदास आहेत. उत्तमलक्षण ही कविता 'श्रीदासबोध' या ग्रंथातून घेतली आहे. या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना 'काय करावे' आणि 'काय करू नये' याबाबत संत रामदासांनी मार्गदर्शन केले आहे.
काव्यसौंदर्य - समाजात राहत असताना समाजातील प्रत्येक व्यक्तीशी आदर्श वर्तन केले पाहिजे. वाईट मार्गाचा अवलंब करून धनसंपत्ती मिळवू नये. जीवन जगत असताना पुण्य मार्ग कधीही सोडू नये. नीतीधर्माने वागणे हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. तो आपण स्वीकारला पाहिजे. हा संदेश संत रामदास यांनी या काव्यपंक्तीतून दिलेला आहे.
भाषिक वैशिष्ट्ये - 'उत्तमलक्षण' ही शांत रसाचा अनुभव देणारी रचना आहे. या रचनेत यमक साधणारे शब्द आलेले आहेत. जसे - 'भांडो नये - तंडो नये'. या कवितेचा रचनाप्रकार ओवी हा आहे. अपकीर्ती - सतकीर्ती व सांडावी - वाढवावी या विरोधी शब्दांमळे  काव्यपंक्तीत गोडवा निर्माण झालेला आहे.

वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते 
असल्यासारखे वागलो तर वस्तू 
प्रचंड सुखावतात.
आशयसौंदर्य - वरील काव्यपंक्ती 'वस्तू' या कवितेतील आहेत. या कवितेचे कवी द. भा. धामणस्कर हे आहेत. ही कविता 'भरून आलेले आकाश' या काव्यसंग्रहातील आहे कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की, व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते. वस्तूंना ही भावना असतात हे समजून त्या वापराव्यात. ही भावना कवितेतून व्यक्त होते.
काव्य सौंदर्य - आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वस्तूंचा उपयोग आपण सतत करत असतो. त्यामुळे वस्तू आणि व्यक्ती यांच्यामध्ये एक भावनिक नाते निर्माण होते. वस्तू या निर्जीव असल्या त्यांना मनही नसेल, जीवही नसेल तरीही वस्तूंना मन आहे,  जीव आहे हे समजून प्रत्येक व्यक्तीने त्यांच्याशी वागले पाहिजे. व्यक्तीकडून वस्तूंबाबत असे भाव निर्माण झाल्यास वस्तू प्रचंड सुखावतात, आनंदीत होतात.
भाषिक वैशिष्ट्ये - वस्तू ही कविता 'मुक्तछंद' या प्रकारातील आहे. वस्तूंनाही स्वच्छ राहण्यास आवडते, वस्तूंनाही भावना असतात. अशी कवी कल्पना या कवितेत झाल्यामुळे येथे चेतनगुणोक्ती अलंकार झालेला आहे. कवितेतील भाषा साधी, सोपी, सरळ असल्यामुळे वस्तूंविषयी आपल्या मनामध्ये स्नेह निर्माण होतो.

'भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात 
हातात हात असेल दोघांचाही'

आशयसौंदर्य- वरील काव्यपंक्ती या 'आश्वासक चित्र' या कवितेतील आहे. या कवितेच्या कवयित्री नीरजा आहेत. ही कविता 'निरर्थकाचे पक्षी' या काव्यसंग्रहातील आहे. या कवितेतून स्त्री- पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटलेले असून, ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
काव्यसौंदर्य- लहानपणी खेळल्या जाणाऱ्या भातुकलीच्या खेळातील संसार हा काल्पनिक असतो.  मोठेपणी प्रत्यक्ष संसारातील जबाबदाऱ्या या खऱ्या असतात. भातुकलीच्या खेळातील लहान मुलगा आणि मुलगी प्रत्यक्ष संसारात एकमेकांच्या साथीने आणि सहकार्याने जगात वावरतील हा अर्थ या काव्यपंक्तीतून व्यक्त होतो.
भाषिक वैशिष्ट्ये- आश्वासक चित्र ही कविता 'मुक्तछंद' या प्रकारातील आहे. या कवितेत कवयित्रीने बाहुली व चेंडू ही प्रतीके वापरलेली आहेत. कवितेची भाषा संवादात्मक आहे. कवितेतील मुलगा आणि मुलगी यांच्यातील सहज सोप्या भाषेतील संवाद आणि त्यातून स्त्री- पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे.

सुसंगती सदा घडो; सुजन वाक्य कानी पडो;
आशयसौंदर्य- वरील काव्यपंक्ती 'भरतवाक्य' या कवितेतील आहे. या कवितेचे कवी मोरोपंत हे आहेत. ही कविता 'केकावलि' या रचनेतून घेतलेली आहे. मोरोपंतांनी या रचनेत सज्जन माणसांच्या सहवासाचे व सदविचारांच्या श्रवणाचे महत्त्व सांगितलेले आहे.
काव्यसौंदर्य- वरील काव्यपंक्तीतून मोरोपंत यांनी नेहमी सज्जन व्यक्तींचा सहवासात राहणे आवश्यक आहे.  तसेच आपल्या कानावर सुविचार पडावेत असे सांगितले आहे. थोडक्यात सत्कर्म व सज्जन माणसांचा सहवास याची शिकवण या रचनेतून दिली आहे.
भाषिक वैशिष्ट्ये- या कवितेतील पडो- नावडो, अडो-जडो, टळो-वळो अशा शब्दरचनेमुळे यमक अलंकार प्राप्त झालेला आहे. यमक अलंकारामुळे कवितेला गेयता प्राप्त झालेली आहे. या कवितेतील भाषा संस्कृतप्रचूर असल्याने कठीण वाटते. 'सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो' ही कवितेची सुरुवात सुभाषित म्हणून लोकप्रिय आहे. या कवितेतून भक्तीरसाचा प्रत्यय येतो.

'झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे'
आशयसौंदर्य- वरील काव्यपंक्ती 'खोद आणखी थोडेसे' या कवितेतील आहे. या कवितेच्या कवयित्री आसावरी काकडे आहेत. ही कविता 'लाहो' या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे महत्त्व कवयित्रीने या कवितेत सांगितलेले आहे.
काव्यसौंदर्य- आपले ध्येय साध्य करताना संयमाने, जिद्दीने, आत्मविश्वासाने कार्यरत राहायला हवे. आपण जिथे थांबतो, तिथून चिकाटीने आणखी थोडेसे पुढे गेले तर यश निश्चितच मिळते. म्हणून यश प्राप्त होईपर्यंत सदैव प्रयत्न करणे आवश्यक आहे. हा संदेश या काव्यपंक्तीतून मिळतो.
भाषिक वैशिष्ट्ये - या कवितेच्या प्रत्येक चरणात आठ अक्षरे आहेत. पाणी -नाणी, जरासे -थोडेसे अशा शब्दांद्वारे यमक साधले गोले आहे. कवितेतील भाषा ही संवादात्मक आहे. संवादात्मक भाषाशैलीमुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झालेले आहे.

'घामातून मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले'
आशय सौंदर्य - वरील काव्यपंक्ती 'आकाशी झेप घे रे' या कवितेतील आहेत. या कवितेचे कवी जगदीश खेबुडकर हे आहेत. कवीने सुरक्षिततेचे, परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व या कवितेतून सांगितले आहे.
काव्यसौंदर्य - प्रत्येकाने आपल्या क्षमतेवर, आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. जो कष्ट करेल त्याला त्याचे फळ नक्कीच मिळेल. घाम गाळल्यानेच, कष्ट केल्यानेच आपले ध्येय साध्य होते. कामामध्येच ईश्वर आहे. असे मानून यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश कवी जगदीश खेबुडकर देतात.
भाषिक वैशिष्ट्ये - 'आकाशी झेप घे रे' ही कविता गीतकाव्य आहे. कवीने 'पिंजरा' हे पारतंत्र्याचे प्रतीक तर 'पंख' हे मुक्तपणे आकाशात विहार करण्याचे प्रतीक म्हणून वापरलेले आहे. कवितेची भाषा सहज, सोपी व सरळ आहे. हे गीतकाव्य असल्यामुळे कवितेला गेयता आहे.

'तुझे शब्द जसे की 
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की 
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.'
आशयसौंदर्य - वरील काव्यपंक्ती 'तू झालास मूक समाजाचा नायक' या कवितेतील आहेत. या कवितेचे कवी ज. वि. पवार हे आहेत. ही कविता 'नाकेबंदी' या काव्यसंग्रहातून घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा जो सत्याग्रह केला त्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब यांच्या कार्याचा गौरव या कवितेतून कवीने केलेला आहे.
काव्यसौंदर्य - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा अन्यायग्रस्त समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी विचार मांडायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या वाणीतून निघणारा प्रत्येक शब्द महाकाव्यापेक्षाही महान होता. त्यांचा संघर्ष असा होता की प्रसंगी काठ्यांचीही शस्त्रं झाली.
भाषिक वैशिष्ट्ये - ही कविता 'मुक्तछंद' या रचना प्रकारातील आहे. कवी प्रत्यक्षात डॉ. बाबासाहेब यांच्याशी संवाद साधत असल्याचा भास यातून होतो. कवितेतून आपल्याला वीर रसाचा प्रत्यय येतो. 'मूक समाजाचा नायक', 'आकाश हादरलं', 'पृथ्वी डचमळली', 'बिगुल प्रतीक्षा करतोय' अशा शब्दप्रयोगांनी कवितेच्या सौंदर्यात भर पडलेली आहे.

- विनोद वाघ (98600 22600)
रावसाहेब पटवर्धन विद्यालय व ज्यु. कॉलेज, पुणे. 






Comments

Popular posts from this blog

इयत्ता 10 वी - मराठी (पद्य विभाग)