इयत्ता 10 वी - मराठी (पद्य विभाग)
* कविता- उत्तम लक्षण
* कवी- संत रामदास
* काव्यसंग्रह- श्री दासबोध
* कवितेचा सारांश /विषय-
संत रामदास यांनी 'उत्तम लक्षण' या कवितेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत.
* कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे-
मला ही कविता आवडली, कारण आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगणारी ही संत रामदासांची उत्तम रचना आहे. दैनंदिन जीवनात काय करावे व काय करू नये हे त्यांनी अनेक उदाहरणांवरून सांगितले आहे. आपले आचरण उत्तम असावे, विवेकाने वागावे, जेणेकरून आपली लोकप्रियता वाढेल. असा संदेश कवी संत रामदास यांनी या कवितेतून दिला आहे.
कविता- वस्तू
कवी- द. भा. धामणस्कर
काव्यसंग्रह - भरून आलेले आकाश
कवितेचा सारांश/ विषय- निर्जीव वस्तूंनाही भावना असतात हे समजून त्यांच्याशी वागावे, त्यांना जपावे. या भावना कवी द. भा. धामणस्कर यांनी व्यक्त केल्या आहेत.
कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे-
ही कविता म्हणजे मुक्तछंद काव्याचा प्रकार असून ही कविता मला खूप आवडली. ज्या वस्तू आपण दीर्घकाळ वापरतो त्या वस्तूंशी आपले एक भावनिक नाते तयार झालेले असते. वस्तू निर्जीव असल्या तरी त्यांनाही भावना आहेत, असे समजून आपण त्यांच्याशी वागायला हवे. ही गोष्ट मला खूप आवडली.
कविता - आश्वासक चित्र
कवयित्री- नीरजा
काव्यसंग्रह- निरर्थकाचे पक्षी
कवितेचा सारांश /विषय- 'आश्वासक चित्र' या कवितेत कवयित्री नीरजा यांनी स्त्री-पुरुष समानतेचे आश्वासक चित्र पाहिले आहे.
कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे-
कवयित्री नीरजा यांनी स्त्री-पुरुष समानतेचे विचार या कवितेतून मांडलेले आहेत. ते प्रत्यक्षात यावे असे मला मनापासून वाटते. म्हणून ही कविता मला खूप आवडली. स्त्री-पुरुष समानतेसाठी कवयित्रीने बाहुली आणि चेंडू ही प्रतीके वापरलेली आहेत.
कविता - भरतवाक्य
कवी - मोरोपंत
काव्यसंग्रह- केकावली
कवितेचा सारांश /विषय-
कवी मोरोपंत यांनी 'भरतवाक्य' या कवितेत सज्जन माणसांच्या सहवासाचे व चांगल्या विचारांचे महत्त्व सांगितले आहे.
कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे-
ही कविता मला आवडली कारण यात चांगली कामे करावीत, चांगल्या व्यक्तींच्या सहवासात रहावे हे कवी मोरोपंत यांनी सांगितले आहे. तसेच खोटा अभिमान बाळगू नये, कोणत्याही मोहाला बळी पडू नये. अशी शिकवण 'भरतवाक्य' या कवितेतून दिली आहे.
कविता- खोद आणखी थोडेसे
कवयित्री - आसावरी काकडे
काव्यसंग्रह - लाहो
कवितेचा सारांश /विषय -
जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता याचे खूप महत्त्व आहे. वास्तव आनंदाने स्वीकारून कष्ट करण्याची तयारी ठेवावी. असा संदेश कवयित्री आसावरी काकडे यांनी या कवितेतून दिला आहे.
कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे-
आपण कोणतेही काम सकारात्मकतेने केले तर ते नक्की यशस्वी होते. हा विचार कवयित्री आसावरी काकडे यांनी 'खोद आणखी थोडेसे' या कवितेतून मांडला आहे. तसेच माणसातील चांगुलपणावर विश्वास ठेवावा, भ्रमात राहू नये असेही कवयित्री सांगतात.
कविता - आकाशी झेप घे रे
कवी - जगदीश खेबुडकर
काव्यसंग्रह - चित्रपट गीत (आराम हराम आहे)
कवितेचा सारांश/ विषय-
पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची ओळख करून देताना आपल्या सामर्थ्यांवर, क्षमतांवर विश्वास ठेवावा. असा संदेश कवी या कवितेतून देतात.
कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे-
'आकाशी झेप घे रे पाखरा' हे चित्रपट गीत असल्याने त्याला सुरेख अशी चाल आहे. म्हणून मला ही कविता खूप आवडते. माणसाने कोणावरही अवलंबून न रहाता स्व- सामर्थ्याने आपल्या सर्व क्षमतानिशी प्रयत्न करावेत असे कवी जगदीश खेबुडकर आपल्याला सांगतात.
कविता - तू झालास मूक समाजाचा नायक
कवी - ज. वि. पवार
काव्यसंग्रह - नाकेबंदी
कवितेचा सारांश/ विषय-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जुन्या रूढी, परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली. अशा या समाजनायकाला कवीने या कवितेतून अभिवादन केले आहे.
कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचे चवदार तळे सर्व दलित बांधवांसाठी खुले व्हावे म्हणून जो यशस्वी सत्याग्रह केला. त्या सत्याग्रहाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कवी ज. वि. पवार यांनी हे काव्य रचले आहे. सहज, सोपी भाषा असल्याने ही कविता मला आवडली.
- विनोद वाघ
रावसाहेब पटवर्धन विद्यालय व ज्यु. कॉलेज,
पुणे ४११०३०.
Comments
Post a Comment